मुक्ताई मंदिराचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वास येणार – ५ कोटींची तरतूद

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मुक्ताई मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी तातडीने ५ कोटी रुपये निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली. कोरोना काळापासून निधीअभावी मुक्ताई मंदिराचे रखडलेले बांधकाम पूर्णत्वास येणार आहे.

संत मुक्ताई महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सवा निमित्त दि.१ मार्च २०२२ रोजी आदिशक्ती मुक्ताई यांच्या कोथळी ता.मुक्ताईनगर येथील मूळ मंदिरात पहाटे पूजा व अभिषेकासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे सपत्नीक आले असता येथे मंदिराचे पुजारी व भाविक वारकऱ्यांनी कोरोना काळापासून निधीअभावी मुक्ताई मंदिराचे बांधकाम रखडलेले असल्याची माहिती दिली होती. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते.

यानंतर त्यांनी अधिवेशन काळात राज्याचे पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने  मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी तातडीने ५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

मंदिराचे हेमांडपंथी लुकचे काम प्रगतीपथावर होते. परंतु कोरोना काळात शासनातर्फे सर्वच निधींवर कात्री लावण्यात आलेली होती.याचा परिणाम जुनी कोथळी येथे सुरू असलेल्या मुक्ताई मंदिराच्या बांधकामावर झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून काम बंद पडलेले होते. दरम्यानच्या काळात वारकरी व भाविकांना सदरील काम तात्काळ पूर्णत्वास जावे अशी आशा होती. परंतु कोरोना विश्व महामारीने सर्वच आशांवर पाणी फिरले होते.परंतु आमदारांनी याबाबत पाठपुरावा केल्याने या बांधकामावर सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने आता लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येईल अशी निर्माण झालेली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!