देऊळवाडे येथील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

जळगाव प्रतिनिधी । ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते.

दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या मंडळाला भेट देऊन गणरायाची आरती केली. याप्रसंगी प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. आरती झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.

ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी देऊळवाडे गावात विविध कामांना गती मिळाली आहे. यात शाळा खोलीचे बांधकाम- ८ लक्ष रूपये; शाळेला संरक्षक भिंत- ७ लक्ष रूपये; चावडी चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे-३ लक्ष रूपये; सौर उर्जेवर चालणारा दुहेरी पंप योजना ; व्यायामशाळेचे बांधकाम-१० लक्ष रूपये आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील शाळा खोलीचे काम व संरक्षक भिंतीसह सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तर, उर्वरित कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच शाळा व परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम भर पावसात झाला. यावेळी  शेकडो महिला व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते हे विशेष.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, देऊळवाडे गावाला सुजदे, आसोदा आदींसह अन्य गावांशी जोडणार्‍या रस्त्यांची कामे पूर्णत्वाला आलेली आहेत. गावात देखील झपाट्याने विकासकामे सुरू असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. गावातील मुंजोबा मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर देऊळवाडेसाठी पाण्याची टाकी आणि जलवाहिन्यांची तरतूद सुध्दा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

कोणताही सण वा उत्सव हा सामाजिक एकोप्याचा संदेश देत असतो. गणेशोत्सवात एकाच गावात विविध मंडळांनी गणरायाची स्थापना करण्याऐवजी एकच गणपती बसविला तर ते केव्हाही उत्तम असते. यातून गावाची एकजूट दिसते. गावामधील ज्येष्ठ मंडळींनी ज्या पध्दतीने एकोपा दाखविला, त्याच पध्दतीने तरूणांनी देखील एकोपा दाखविण्याची गरज आहे. देऊळवाडकरांचा हा एक गाव एक गणपतीचा पॅटर्न स्तुत्य असून इतर गावांनी याचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ना. पाटील यांनी याप्रसंगी गणेश मंडळाला दहा हजार रूपयांची देणगी सुध्दा जाहीर केली.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे,कानळदा येथील शिक्षण संस्था चेअरमन प्रकाश सपकाळे, भोलाणे येथील अशोक सपकाळे, धामणगाव येथील किरण सपकाळे, देऊळवाडच्या सरपंच सरस्वतीबाई श्रावण सोनवणे, उपसरपंच सरूबाई अमृत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश सोनवणे, राजू सोनवणे, सारिका सोनवणे, सुनंदा सोनवणे, उत्तम सोनवणे, गेंदालाल सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, भीमराव पाटील आदी मान्यवर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेनेचे संघटक तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केले तर आभार सरपंच सारस्वतीबाई सोनवणे यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!