तिरूवनंतपुरम-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या १४ कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 19 डिसेंबर 2021 रोजी भाजपच्या ओबीसी शाखेचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती.
मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्हीजी श्रीदेवी यांनी हा निकाल दिला. मृत नेत्याच्या वकिलाने सांगितले की, शिक्षा झालेले सर्व आरोपी ट्रेंड किलर स्क्वाडचा भाग होते. रणजीत यांची आई, पत्नी आणि मुलासमोर ज्या क्रूर आणि निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यामुळे हा खून दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीत येतो. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले होते की, 19 डिसेंबर 2021 रोजी रणजित श्रीनिवास अलाप्पुझा शहरातील त्यांच्या घरी मॉर्निंग वॉकसाठी तयार होत असताना हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांची आई, पत्नी आणि मूलही घरात होते.
या हल्लेखोरांनी भाजप नेत्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने रणजित यांचा जागीच मृत्यू झाला. रणजीत यांनी नुकतीच भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते पेशाने वकील होते. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नेत्याची रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या एक दिवस आधी हत्या करण्यात आली होती. 18 डिसेंबरच्या रात्री एसडीपीआयचे राज्य सचिव केएस शान आपल्या बाईकवरून घरी परतत असताना त्यांना एका कारने धडक दिली. यानंतर त्यांच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या हत्येसाठी भाजप आणि एसडीपीआयने एकमेकांवर आरोप केले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी म्हणाले की, सीपीएमच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने देवाच्या देशाला जिहादींसाठी नंदनवन बनवले आहे.केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही या हल्ल्यांचा निषेध केला. त्यांनी केरळमध्ये गुंडगिरीचा आरोप केला आणि राज्य हत्याकांडात बदलत असल्याचे सांगितले.
एसडीपीआयने आरएसएस कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. पक्षाचे प्रमुख एमके फैजी यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘या घटना संघ परिवाराच्या जातीय हिंसाचाराचा आणि राज्यात सलोखा बिघडवण्याच्या अजेंडाचा भाग आहेत. आरएसएसच्या दहशतवादाचा आम्ही निषेध करतो. केरळ पोलिसांची उदासीन वृत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मारक ठरते.