खासदार साध्वी सिंह यांना मिळाले संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सन २००८ मधील मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात जामीनावर बाहेर असलेल्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना चक्क संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधले होते. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी आहे. तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे.

Protected Content