लंडन वृत्तसंस्था । वर्ष २०१९ मधील सर्व कसोटी आणि टी-२० सामने संपले असून आता पुढच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचे बायबल मानले जाणारे विस्डेन मासिकाच्या वेबसाइटने रोहित शर्मा आणि एमएस धोनी यासारखे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंना वगळले असून दशकातील सर्वोत्कृष्ट संघाची घोषणा केली आहे.
या दशकातील सर्वोत्तम टी-२० संघात हिटमॅन रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. या संघात सलामीवीर म्हणून कॉलिन मुनरो आणि अॅरॉन फिंच यांची निवड केली आहे. मुनरो आणि फिंच यांचा स्ट्राइक रेट १५० पेक्षा अधिक आहे. विस्डेनचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया येत आहे. टी-२० प्रकारात सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून रोहितची ओळख आहे. असे असताना देखील विस्डेनने त्याला संघात स्थान दिले नाही. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये रोहितने सर्वाधिक चार शतके झळकावली आहेत. विस्डेनने या संघाचे कर्णधारपद फिंचकडे सोपवले आहे. संघात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह बुमराहला जागा देण्यात आली आहे.