देशातील ४ शहरांमध्ये राजधान्या बनवा — ममता बॅनर्जी

कोलकाता: वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाची राजधानी दिल्लीच का? असा सवाल केला आहे. कोलकात्यासह देशाच्या चार ठिकाणी राजधानी बनवा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याला देशाची राजधानी करण्याची मागणी करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त ममता बॅनर्जी यांनी आज लाँगमार्चचं आयोजन केलं होतं. त्यानंतर जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. केवळ दिल्लीच देशाची राजधानी का? कोलकाताही देशाची राजधानी व्हावी. देशाच्या चार ठिकाणी देशाची राजधानी असावी. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, उत्तरेत पंजाब, हरयाणा, पूर्व बिहार, ओडिशा, बंगालमध्ये देशाच्या राजधानी निर्माण व्हाव्यात. उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्येही देशाची राजधानी असावी. केवळ दिल्लीपर्यंतच मर्यादीत का राहायाचं?, असा सवाल त्यांनी केला.

दिल्लीत सर्वच आऊटसायडर आहेत, असं सांगतानाच संसदेचं अधिवेशन देशाच्या प्रत्येक भागात झालं पाहिजे. केवळ एकाच ठिकाणी संसदेचं अधिवेशन कशासाठी? देशाच्या इतर भागात टप्प्याटप्प्याने संसदेचं अधिवेशन का घेतलं जात नाही? कोलकात्यामध्ये संसदेचं अधिवेशन का होऊ शकत नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

पश्चिम बंगालचं स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठं योगदान राहिलं आहे. भारतीय पुनर्जागरणाची सुरुवातही बंगालमधूनच झाली. बंगालने कधीच कुणापुढे मस्तक झुकवले नाही आणि झुकवणार नाही, असं सांगतानाच सध्या वन नेशन, वन पार्टी आणि वन व्होटच्या गप्पा मारल्या जात आहेत. चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात असून खरा इतिहास नाकारला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी ९ किलोमीटरचा मार्च काढला. सायरन वाजवून आणि शंखनाद करत हा मार्च काढण्यात आला. या मार्चच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं.

Protected Content