धरणात पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री येथील धरणात पोहण्यास गेलेला सावखेडासीम येथील २२ वर्षीय तरुण पाण्यात बेपत्ता झाला आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बुडणार्‍या त्याच्या भावाला वाचविण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, सावखेडासीम येथील फिरोज वसीम खाटीक हा युवक आपल्या मित्र व भावासह तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वड्री येथील धरणात आज सायंकाळी ४ .४५ वाजेच्या सुमारास पोहण्यास गेला होता. याप्रसंगी तो पाण्यात बुडाला. त्याच्या भावासह मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यातील कुणालाही पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली मात्र उपयोग झाला नाही. त्या सर्वांच्या नजरे समोर पाहता पाहता तो पाण्यातुन बेपता झाला. त्याचा भाऊ शाहरूख खाटीक याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला पोहता येत नसल्यामुळे तो देखील बुडू लागला. मात्र उपस्थितांना त्याला वाचविण्यात यश आले.

दरम्यान यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी माहीती मिळताच तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठविले असून युवकाचा शोध सुरू असुन अद्याप पर्यंत तो मिळुन आलेला नाही. आपल्या भावाला मी पाण्यात बुडतांना पाहीले पण पोहता येत नसल्याने भावास वाचविता आले नसल्याची खंत व दुःख त्याचा भाऊ शाहरूख खाटीक यांने व्यक्त केली.

Protected Content