जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीतील क्वालिटी कंट्रोल बॉयलरचा स्फोटात दोन जणांचा तर त्यानंतर गंभीररित्या जखमी झालेले अन्य दोन असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सचिन श्रावण चौधरी (वय २४, रा. रामेश्र्वर कॉलनी) हा देखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथे उपचार सुरु असतांना सोमवारी प्राणज्योत मालवली. त्यामुळे स्फोटातील मृतांची संख्या आता पाचवर गेली आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील मोरया ग्लोबल लिमीटेड या सुगंधीत द्रव्य तयार होणाऱ्या कंपनीत दि. १७ एप्रिल रोजी बॉयलरचा स्फोट होवून आग लागली होती. या आगीत समाधान पाटील व रामदास घोलाणकर या दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर १८ कामगार जखमी झाले होते, त्यापैकी ९ जण हे ६० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या गेल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना किशोर चौधरी व दीपक सुहा या दोघ कामगारांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. दरम्यान, सचिन चौधरी याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर तेथेच उपचार सुरु होते.
स्फोटात गंभीररित्या भाजले गेलेल्या कामगारांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात केमिकल गेले होते. तसेच ते पुर्णपणे भाजले गेल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने दि. १८ रोजी सचिन चौधरी यांना घाटी येथे उपचार केले जात होते. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच त्याला तेथीलच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरु असतांना सचिनची प्रकृती चिंजाजनक होवून त्याचा सोमवारी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.