खड्डयांमुळे उद्योजकाचे मृत्यू ; आयुक्तांची होणार चौकशी

jalgaon 1

जळगाव, प्रतिनिधी | दुचाकीवरुन शहरातून जात असतांना खड्डयांमुळे तोल जावून रस्त्यावर पडल्यानंतर दुचाकीस्वार उद्योजक अनिल बोरोले यांना ट्रकने चिरडल्याची घटना १३ जुलै २०१९ रोजी घडली होती. खड्डयांमुळे हा अपघात झाल्याने त्यास जबाबदार महापालिका आयुक्त, अभियंता, कंत्राटदार यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांसह, अधिकारी, कंत्राटदार यांची चौकशी होणार असून चौकशीसाठी ६ जानेवारी रोजी हजर रहावे, अशी नोटीस जिल्हापेठ पोलिसांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना बजावली आहे.

घराकडे दुचाकीने परतणारे द्वारका इंडस्ट्रीजचे संचालक अनिल श्रीधर बोरोले ( ६८)रा. पोस्टल कॉलनी यांची चित्राचौकात असलेल्या खड्डयांमुळे दुचाकी उदळून ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने बोरोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. खड्डयांमुळे बोरोले यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जुलै रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. बोरोले यांच्या मृत्यूस महापालिका आयुक्त, मनपाचे अभियंता, रस्ता बनविणारे कंत्राटदार, त्याची देखभाल करणारे जबाबदार व्यक्ती हे सर्व जबाबदार असून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

माहिती अधिकाराच्या अर्जानंतर यंत्रणा गतीमान……….

पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीला तब्बल दोन महिने उलटूनही याप्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्याने दिपककुमार गुप्ता यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज करुन कारवाईबाबत माहिती मागितली होती. या माहिती अधिकार अर्जानंतर यंत्रणा गतीमान झाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनतर्फे महापालिका आयुक्त, अधिकारी, कंत्राटदार यांना चौकशीसाठी दि. ६ रोजी सायंकाळी ४ वाजता हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. यावेळी तक्रारदार दिपककुमार गुप्ता यांनाही हजर राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. चौकशीनंतर काय कारवाई होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Protected Content