डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |जळगाव – भविष्यात फिजीओथेरेपीस्ट हाच सशक्त जीवनाचा आधार असल्याचे मत गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज पदवी प्रदान समारंभात व्यक्त केले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा सन २०२३ चा पदवी प्रदान समारंभ शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी डॉ.केतकी हॉल येथे मोठ्या थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.अमित जैसवाल, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.अश्वीनी कलसे, राहुल गिरी आदी मान्यवर उपास्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर म्हणाले कि, एक जबाबदार फिजीओथेरेपीस्ट तुम्हाला व्हायचे आहे. समाजाच्या सशक्तिकरणात फिजीओथेरेपीस्टची भुमिका खुप मोठी आहे. त्यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. यानंतर अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर म्हणाले की, स्वप्न सत्यात उतरल्याचा हा दिवस आहे. शेवटच्या दिवसापर्यंत शिकत राहा. इथुन तुमचे करिअर सुरु होत असून तुुमचे नाव उंचावर जाऊ द्या असेही ते म्हणाले. या समारंभात माजी खा. डॉ. उल्हास पाटील व मान्यवरांच्या हस्ते तीन पदविकारधारक व ४० पदवीधर विद्यार्थ्यांना फिजीओथेरपीस्ट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी डॉ. सोहम जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षता महा आणि अस्मिता जुमडे यांनी केले. याप्रसंगी साडेचार वर्षाच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबतचे क्षण स्लाईड शोच्या माध्यमातून सादर करण्यात आले.

Protected Content