मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम प्रकल्पाचा शुभारंभ

प्रोजेक्ट बाला व निर्णय फाऊंडेशन यांचा पुढाकार 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत ६ वी ते १२ वी च्या किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी बाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने प्रोजेक्ट बालाच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन मार्फत मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच सातपुडा विकास मंडळ पाल संचलित अनुदानित आश्रमशाळा लोहारा ता रावेर येथे नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर तसेच रावेरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी तायडे यांच्या हस्ते करण्यात आला.

अरुण पवार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास मुख्याध्यापक सुधाकर झोपे,  सुनील सपकाळे तसेच शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले. प्रोजेक्ट बालाच्या अंमलबजावणी प्रमुख (Implementation Lead) कोमल ससाणे यांनी किशोरवयीन मुलींना मागर्दर्शन केले. मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील एक मुलभूत घटक आहे आणि यासाठी योग्य माहितीची आवश्यकता आहे. महिलांच्या व किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेली संस्था प्रोजेक्ट आणि निर्णय फाउंडेशन यांच्या माध्यमातून योग्य माहिती देऊन महिला व मुलींना याचे व्यवस्थापन करणे सोपे होईल असे सांगितले.

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळीच्या काळात चुकीचा पद्धतीचा अवलंब केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच किशोरवयीन मुली शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळेतील मुलींना याबाबत योग्य आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करुंन देण्यासाठी प्रोजेक्ट बाला यांच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशनने सर्वसमावेशक उपक्रम तयार करून मासिक पाळी या विषयातील गैरसमज आणि अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पात मुख्य उद्दिष्ट मासिक पाळी बद्दल शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समुदायामध्ये  वैज्ञानिक माहिती पोहोचवून मुली आणि महिलांना सक्षम करण्यात येणार आहे. तसेच चर्चासत्र आयोजित करून विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून त्यांच्या पुरुत्पादक आरोग्य विषयी परिपूर्ण माहिती दिली जाईल. या माहितीचा उपयोग त्यांचे सशक्तीकरण व त्यांच्या आरोग्याविषयी निर्णय घेण्यास मदत होईल.

मासिक पाळीच्या दरम्यान वापरण्यात येणारे प्रोडक्ट मिळवतांना अनेक अडचणी येतात. महिला व किशोरवयीन मुलींना प्रोडक्ट न मिळाल्याने बहुतांश वेळा अस्वच्छ आणि धोकादायक प्रोडक्टचा वापर करावा लागतो त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.  त्या अडचणी ओळखून मासिक पाळीचे सन्मानाने व सुरक्षित व्यवस्थापन करता यावे यासाठी प्रोजेक्ट बाला यांच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन मार्फत किशोरवयीन मुली आणि महिलांना सुरक्षित आणि परवडणारी व पुन्हा पुन्हा वापरात येणारे कापडी पॅडचे वितरण करण्यात येणार आहे.

कोट –

प्रोजेक्ट बालाच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन जळगाव जिल्ह्यात किशोरवयीन मुली व महिलांमध्ये मासिक पाळी विषयी जनजागृतीसाठी काम करत आहे. यामध्ये मासिक पाळी बद्दलचे मौन तोडून योग्य वैज्ञानिक माहिती पोहोचवून महिला व मुलींना सक्षम करण्यात येणार आहे.

– संगीता बालोडे सह संस्थापक, निर्णय फाउंडेशन

 

Protected Content