मेहरूण येथील बंदावस्थेतील टी.बी.हॉस्पिटलची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पाहणी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात सर्वसाधारण ओपीडीची सुरूवात करावी आणि मेहरूण परिसरात बंदावस्थेत असलेले टीबी हॉस्पिटल कोवीड रूग्णांसाठी पुन्हा सुरू करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत आज जिल्हा शल्यचिकित्स एन.चव्हाण यांनी टीबी हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली.

दिपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरात टी.बी.रूग्णालय बंदावस्थेत पडून आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढते रूग्णांना उपचारासाठी टी.बी. रूग्णालयाचा उपयोग होवू शकतो. हा भाग शहरापासून बाहेर असल्याने रूग्णांवर चांगल्या पध्दतीने उपचार होवू शकतो. तसेच जिल्हा रूग्णालय हे सध्या कोवीड रूग्णालय घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात, गरोदर महिला, सदी, ताप आलेल्यांना गोदावरी शासकीय महाविद्यालयात जावे लागत आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय हॉस्पिटल हे शहरापासून २० ते २२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णाला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो शिवाय वाहन उपलब्ध नसल्याने आर्थिक र्भूदंड बसत आहे. जिल्हा रूग्णालयात सर्वसामान्य रूग्णांना सेवा देण्यासाठी तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय हॉस्पिटल हे कोवीड सेंटर घोषीत करावे अशी मागणी निवेदनात केली. या निवेदनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.पाटील यांनी बंदावस्थेत पडून असलेले टी.बी.हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Protected Content