रावेरमध्ये धाडसी चोरी : सुटकेसचे लॉक तोडून ३१ हजारांचा ऐवज लंपास


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील उटखेडा गावात घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुटकेसचे लॉक तोडत तब्बल ३१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना रूपाली अतुल पाटील यांच्याशी संबंधित असून, त्या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने उघडून चोरी केली. विशेष बाब म्हणजे घराच्या खिडकीत ठेवलेल्या डब्याखाली त्यांनी घराची चावी ठेवली होती. हीच चावी चोरट्याने काढून घरात प्रवेश केला आणि घरात ठेवलेल्या सुटकेसचे लॉक तोडले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १०,८०० रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ५,४०० रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे झुमके, १०,००० रुपये किमतीच्या पायातील दहा भराच्या चेन पट्या, ४,००० रुपये किमतीचे चार चांदीचे पायातील जोडावे आणि १,२०० रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण मिळून ३१,४०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.

या प्रकरणी रूपाली पाटील यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक सिकंदर तडवी पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर गावात आणि परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे