भुसावळात कोरोना झाला झिंगाट; आबालवृध्दांचा भन्नाट ताल ! ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा निर्भयपणे प्रतिकार करतांना किती विलक्षण सकारात्मकता ठेवता येते हे भुसावळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दिसून आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातल्या कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटीव्ह रूग्ण फावल्या वेळेत धमाल नृत्य करत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे वेळीच निदान होऊन उपचार झाल्यास यावर मात करता येत असल्याचा संदेश या सर्वांनी दिला आहे.

भुसावळ तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्येही सकारात्मकता वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.

भुसावळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये कोविड केअर सेंटर असून येथून बरेच रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या येथे उपचार सुरू असणार्‍या रूग्णांमध्ये अगदी बालकांपासून ते वृध्दांपर्यंतचा समावेश आहे. येथे प्रशासनातर्फे चांगली सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात पौष्टीक अन्नापासून ते प्रसन्न वातावरणाचा समावेश आहे.

दरम्यान, प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधेला रूग्णांनीही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथील रूग्णांनी आज तर चक्क गाण्यांवर ताल धरून बहारदार नृत्य केले. विशेष बाब म्हणजे कोरोनाशी संबंधीत असणार्‍या गाण्यांवरच पॉझिटीव्ह रूग्ण थिरकले.

या संदर्भात उपचार घेत असलेले एक प्रौढ रूग्ण म्हणाले की, कोरोनाचे योग्य निदान होऊन वेळीच उपचार झाल्यास या विषाणूवर यशस्वीपणे मात करता येते. यामुळे कुणीही मनात भिती न बाळगता उपचार घेऊन कोरोनामुक्त व्हावे असे ते म्हणाले. प्रशासनाने चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भुसावळचे नगरसेवक तथा कोरोनाच्या आपत्तीमध्ये लोकांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी हे नियमितपणे या कोविड केअर सेंटरला भेट देत असून रूग्णांचा हौसला वाढविण्याचे काम करत असतात. आज ते आले असतांनाच येथे नृत्य सुरू होते. याबाबत कोठारी म्हणाले की, काळजी घेतली तर कोरोना हा साध्या आजाराप्रमाणे असून कुणीही यावर मात करू शकते.

भुसावळकर हे अतिशय जिंदादिल म्हणून ओळखले जातात. येथील नागरिकांचा हा जीवंतपणा आणि उर्जा कोरोनाचा उपचार घेतांनाही दिसून आली आहे. यामुळे भुसावळच्या कोविड केअर सेंटरमधील बहारदार नृत्य चर्चेचा विषय बनले आहे.

खालील व्हिडीओत पहा भुसावळातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचे धमाल नृत्य.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/320956732647723/?eid=ARCWxegGthrpHEOsqPeKwqLb31lvvpsfFEAI9jYPklz5MBrKJ_2t0uOTq4sLno5pFSA-i2uw8a61FYNx

Protected Content