पहूर येथे आज पुन्हा १० कोरोना बाधीत; रूग्णसंख्येची शतकाकडे वाटचाल !

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १० नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामुळे येथील रूग्ण संख्येची शतकाकडे वाटचाल होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

पहूर येथे आज मंगळवारी १० जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहीती वैद्यकिय अधिकार्‍यांनी दिली. येथील कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी पून्हा कार्यान्वीत होवू पाहत आहे .दिवसेंदिवस कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असून पहूर गावाची शतकाकडे वाटचाल सुरू आहे .

पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आज ४८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यात पहूर येथील ४वर्षीय चिमूल्यासह १० जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन प्रणाली सुरु झाल्यापासून रुग्णांना दिलासा मिळाला आहे. यातील १५ खाटा कोवीड रुग्णांसाठी असून उर्वरीत १५ खाटा नॉन कोवीड रुग्णांसाठी आहेत . आज घडीला १७ कोवीड रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान येथील तीन वैद्यकिय अधिकारी बाधित असल्याने त्यांच्या वरही उपचार सुरू आहेत . तथापी पहूर येथील भूमीपूत्र कोरोना योद्धा डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णालयातील उपचार अखंडीत सुरू आहेत. त्यांना वैद्यकिय अधिक्षक डॉ हर्षल चांदा यांचे मार्गदर्शन तर डॉ. कुणाल बाविस्कर यांच्यासह सहकार्‍यांचे सहकार्य लाभत आहे.

पहूर परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ येत असल्याने रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट ची टंचाई भासत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने पहूर ग्रामिण रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात किट उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content