राज्यातील कोरोना बाधीतांची संख्या एक लाखावर

मुंबई प्रतिनिधी । राज्यभरात आज ३ हजार ४९३ नवे कोरोना बाधीत आढळून आले असून राज्यातील रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेल्याने राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ६१६ एवढीच असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं.

राज्यात आज १२७ रुग्ण दगावले असून त्यात सर्वाधिक मृतांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आज ९०, ठाण्यात ११, कल्याण-डोंबिवलीत ३, वसई-विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत ३ आणि पुण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. यामध्ये ९२ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी ६७ रुग्ण ६० वर्षांवरील, ५२ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आणि ८ रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. तर ८९ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती देखील आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.

Protected Content