कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ धडकलेल्या रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये भारत आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. रेमल चक्रीवादळामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ताशी १३५ किमी वेगाने वाहणारे हे वादळ रविवारी रात्री नऊच्या सुमारास बांगलादेशच्या दक्षिणेकडील मोंगला बंदर आणि लगतच्या पश्चिम बंगालमधील सागर बेटांच्या आसपासच्या भागात धडकले, अशी माहिती हवामान अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेमल चक्रवादळामुळे भारतात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित मृत्यू पश्चिम बंगालमध्ये झाला. मदत निवारा केंद्रात नेत असताना काहींचा मृत्यू झाला. तर, काहींचा बुडून मृत्यू झाला किंवा प्रचंड पाणी साचल्याने आणि वादळामुळे त्यांची घरे कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा सहा वर पोहोचला आहे. वादळाचा फटका वीजवाहिन्यांनाही बसला असून किनारपट्टीवरील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशात सुमारे ३० लाख तर पश्चिम बंगालमध्ये हजारो लोकांचा वीजपुरवठा खंडीत झाला. १२०० विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर, ३०० मातीच्या झोपड्या पाडण्यात आल्या, अशी माहिती बंगाल प्रशासनाने दिली.