लॉकडाउन संपल्यावर पुरवठा सुधारून महागाई आटोक्यात येईल

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । वस्तूंच्या मागणीप्रमाणे सध्याच्या काळात पुरवठा करण्यावर बंधने येत आहेत. देशाच्या विविध भागांत सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे विविध कालावधीसाठी लॉकडाउन पुनःपुन्हा करावे लागत आहे. एकदा लॉकडाउन संपले की चलनवाढही आपोआप आटोक्यात येईल, असा विश्वास देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी व्यक्त केला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, रिटेल चलनवाढ जुलैमध्ये ६.९३ टक्के होती. या महिन्यात भाज्या, डाळी, मांस व मासे यांच्या किंमती वाढल्यामुळे चलनवाढ झाली होती. मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा न झाल्यामुळे झालेली ही भाववाढ आहे हे लक्षात येते.

रिटेल चलनवाढ कमी होणार नाही, अशी अटकळ आतापर्यंत बांधली जात होती. यामुळे रिझर्व्ह बँकेला पतधोरणाच्या आगामी आढाव्यामध्ये फारसे काही करता येणार नाही, असेही बोलले जात होते. परंतु सुब्रमणियन यांच्या या अंदाजामुळे या विचारांना छेद गेला आहे.

Protected Content