भरधाव वाहनाने सायकलला धडक दिल्याने सायकलस्वार उद्योजकाचा मृत्यू

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जागतिक सायकल दिनी सायकल वारी करणे मंगळवेढ्यातील एका उद्योजकाच्या जीवावर बेतले. सोमवारी पहाटे एकटेच सायकल वारी करीत पंढरपूरकडे जात असताना सांगोल्याजवळ एका भरधाव वाहनाने सायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात सुहास शशिकांत ताड या उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला. सुहास ताड यांनी नियमित सायकल चालवा आणि निरोगी व्हा, असा संदेश स्वतः कृतीत आणत काही तरुण मित्रांचा समूह तयार केला होता. त्यांनी यापूर्वी प्रोत्साहनपर मंगळवेढा-बानूरगड, मंगळवेढा-रायगड, मंगळवेढा-तुळजापूरसह अन्य दूरच्या ठिकाणी सायकल फेरी काढली होती.

मंगळवेढ्यातील मॉल, कापड व अन्य उद्योग व्यवसायात भरारी मारलेले सुहास ताड हे सायकलप्रेमी होते. दररोज सायकल चालविणे हा त्यांचा छंद होता. त्यासाठी त्यांनी मंगळवेढ्यात सायकलस्वारांचा समूह तयार केला होता. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून मंगळवेढा-सांगोला-पंढरपूर व पुन्हा मंगळवेढा हा सायकल वारी सामूहिकपणे केल्यानंतर सोमवारी पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे पंढरपूर वारी करण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने आदल्या दिवशी रात्री मंगळवेढ्यात दोन सायकलस्वार मित्रांची बैठक घेऊन वारीचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु इतर दोन मित्र पहाटे लवकर न आल्याने सुहास ताड हे एकटेच सायकल वारीसाठी पंढरपूरकडे निघाले. मात्र पुढे काही अंतरावर सांगोल्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात ठोकरले.

Protected Content