राज्यात सायबर गुन्ह्यांची उकल वाढली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती, जी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत २५ टक्के झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या ६१३ गुन्ह्यांची उकल करून ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये उकल होण्याचे प्रमाण १९ टक्के आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणून ७४८ आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यांमध्ये उकल होण्याचे प्रमाण २२ टक्के इतके आहे. यावरून सायबर गुन्ह्यांच्या तपासात सुधारणा झाल्याचे स्पष्ट होते.

सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे किंवा केंद्र शासनाच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीसाठीच्या पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधावा. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, अशा गुन्ह्यांबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी अद्ययावत तांत्रिक तपास प्रशिक्षण दिले जाते. तसेच, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहल्ला समित्या, सोसायटी बैठक, जेष्ठ नागरिक क्लब, शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेविषयी माहिती दिली जाते.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‘#ThodaSaSochLe’ या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी स्वतः तयार केलेल्या जनजागृतीपर व्हिडीओ आणि चित्रफिती इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि युट्यूबवर प्रसारित केल्या आहेत. तसेच, निर्भया पथकाच्या माध्यमातूनही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लावून लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाला “घरबसल्या नोकरी” देण्याचे आमिष दाखवून ५.५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हेगारांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आणि अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकाऱ्याने आणि अज्ञात लिंक्सवर क्लिक केल्याने मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून सायबर गुन्ह्यांपासून बचाव करावा.

Protected Content