पाचोऱ्यात शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी

पाचोरा, प्रतिनिधी – तालुक्यातील १०० पैकी ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असुन यासाठी ४३ टेबल वर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते. शेवटच्या दिवशी आॅफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश काढल्याने स्वतंत्र कक्षाची स्थापना करुन ५४० आॅफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

शेवटच्या दिवशी ५:३० ची वेळ मिळाल्याने सायंकाळी ५:३०वाजता तहसिलदार कैलास चावडे, निवडणुक नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, बी. डी. पाटील, अजिंक्य आंढळे, श्याम तिवारी, भरत पाटील यांनी तहसिल कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन इच्छुक उमेदवारांना ५:३० वाजता टोकन दिले होते. त्यांचेच अर्ज दाखल करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या. आॅफलाईन अर्जासोबत मालमत्तेचे प्रतिज्ञा पत्र करुन द्यावयाचे असल्याने सुविधा कक्षात प्रतिज्ञा पत्र करुन घेण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वेळेवर स्टॅम्प उपलब्ध होत नसल्याने इच्छुक उमेदवारांची स्टॅम्प मिळविण्यासाठी दमछाक झाली. 

पाचोरा तालुक्यात गाळण खु”, विष्णुनगर, आंबे वडगांव, आंबे वडगांव तांडा या चार ग्रामपंचायती वगळता ९६ ग्रामपंचायतींसाठी ३१९ प्रभागातुन ८४४ ग्रामपंचायत सदस्य निवडुन द्यावयाचे असल्याने यासाठी ३५२ मतदान केंद्रावर दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून अर्ज माघारीची दि. ४ जानेवारी आहे. तालुक्यात दि. २४ डिसेंबर २०२० रोजी – ६, दि. २८ रोजी – ९७ तर दि. २९ रोजी – ७५४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. बहुतांशी गावात ग्रामपंचायतीच्या दुरंगी , तिरंगी लढतीचे चित्र असुन काही गावांमध्ये निवडणुका बिनविरोध करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करणे सुरू आहे.

 

 

Protected Content