मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी काठावरील श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर मुळमंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले.
देवशयनी आषाढी एकादशीस पंढरपूरला देवाकडे जाता नाही आले तरी संताकडे गेल्याने संताचे व देवाचे दोघांचे दर्शन घडते. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर भाविकांच्या प्रचंड गर्दी फुलून गेले होते. मुलाबासह महिलांची गर्दी दिसून आली.
तत्पूर्वी पहाटे काकड आरती भजनानंतर संत मुक्ताई महापूजा अभिषेक देवराम पाटील नांदगाव यांनी केला, दुपारी हभप रामेश्वर महाराज तिजारे, हभप पंढरीनाथ महाराज कोऱ्हाळा यांचे प्रवचन कीर्तन झाले. रात्रौ नागेश्वर भजनी मंडळाचा हरिजागराचे भजन सेवा झाली. राजू पाटकर मलकापूर, वत्सलाबाई देवराम पाटील यांनी भाविकांना साबुदाणा फराळ व मनोज महाजन नाचणखेडा यांनी केळी वाटप केले.
संत मुक्ताईस पहिल्यांदाच खजुराची आरास
माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे शेतातील ताज्या ओल्या २५० किलो खजुराची आरास करण्यात आली होती. संत मुक्ताबाई स पहिल्यांदाच केलेली खजुराची आरास भाविकांना आकर्षण ठरली .
भाविकांत उत्साह
दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतांनाही भाविकांचा उत्साहात कमी नव्हता. दिवसभर दर्शन बारी भरलेली होती. लाखावर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहीती मुळमंदिर व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांनी सांगीतले. संपूर्ण वारी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.