नवी दिल्ली वृत्तसंस्था । कर्नाटक प्रीमिअर लीगच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी टीम इंडियाच्या आणखी एक खेळाडूचे नाव समोर आले आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषन शाखेचा कसून तपास सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेल्या गोलंदाज अभिमन्यू मिथुनवर आता फिक्सिंगचे सावट आहे. त्यामुळं आता फिक्सिंगचा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बसत आहे. सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
मिथुन केपीएलमध्ये शिवमोगा लायन्स संघाचं नेतृत्त्व करतो. त्याला समन्स बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर संदीप पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. मिथुन सध्या सुरतमध्ये टी-२० खेळत आहे. मिथुनने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असल्यामुळे याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली आहे. मिथुनला केपीएल फिक्सिंग प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील, असे संदीप पाटील म्हणाले. गुन्हे शाखेने केपीएल फिक्सिंग प्रकरणी जुलैपासून आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. यात बेळगाव पँथर्सचे मालक अली अश्फाक थारा यांचाही समावेश आहे. कर्नाटक हायकोर्टाने बुधवारी अली यांचा जामीन अर्जही फेटाळला होता.
गेल्या आठवड्यातच गुन्हे शाखेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि केपीएल संघाच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी नोटीस जारी केली होती. त्यावेळीही मिथुनशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. मिथुनने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना पाच वन डे आणि चार कसोटी सामने खेळले आहेत.