अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांची विशेष पथके नेमून रात्रंदिवस गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे. पहाटे पहाटे केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर आणि दोन टेम्पोवर कारवाई करत ते जप्त करण्यात आले आहेत.
अमळनेर तालुक्यात बोरी, पांझरा आणि तापी नद्यांच्या काठांवरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यापूर्वी तलाठी पथकांना यात फारसे यश मिळत नव्हते. त्यामुळे प्रांताधिकारी मुंडावरे यांनी तातडीने तलाठ्यांची बैठक घेऊन नवीन रणनीती आखली. त्यांनी प्रत्येक वाळू चेकपोस्टवर आणि नदीकाठच्या परिसरात २० ते २५ लोकांचे ‘बैठे पथक’ नियुक्त केले आहे. यात १ मंडळाधिकारी, ६ ते १२ पोलीस पाटील, ३ ते ४ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि ४ ते ६ महसूल सेवक (कोतवाल) यांचा समावेश आहे. महिला तलाठी आणि कोतवाल यांनी दिवसा गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात मांडळ, बोहरा, जळोद, सावखेडा आणि बिलखेडा-फापोरे येथे चेकपोस्ट्स उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चेकपोस्टची हद्द निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे अवैध वाहतुकीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल. बुधवारी २ जुलै रोजी सकाळी बिलखेडा शिवारात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या आदेशानुसार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी पी.एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी एम.आर. पाटील, जितेंद्र पाटील, विकेश भोई यांनी संयुक्त कारवाई केली. त्यांनी दोन ट्रॅक्टर आणि टेम्पो पकडून ते तातडीने तहसील कार्यालयात जमा केले.
विशेष म्हणजे, हिंगोणे खुर्द नजीकच्या अमळनेर गावाजवळ तहसीलदार सुराणा, मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ, वाय. आर. पाटील आणि अमोल पाटील यांनी दोन टेम्पो पकडले. यावेळी तहसीलदार सुराणा यांनी स्वतः ड्रायव्हरशेजारी बसून टेम्पो तहसील कार्यालयात आणला, हे विशेष.
प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सांगितले की, “वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस पाटील आणि कोतवाल यांचीही नियुक्ती केली आहे. तसेच, दररोज पथक बदलले जाणार असल्याने कोणीही ‘सेटिंग’ लावू शकणार नाही.” पोलीस पाटील गणेश भामरे (बाम्हणे) यांनी सांगितले की, “प्रशासनाने सर्व पोलीस पाटलांना क्षेत्रे नेमून दिल्याने आणि रात्री गटाने गस्त घातल्याने अवैध वाळू उपसा नियंत्रणात आला आहे. पोलीस पाटील नदी काठांवर फिरत्या स्वरूपात नजर ठेवून आहेत.”