सहस्त्रलिंग येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी

bibtya halla

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील सहस्त्रलिंग गावानजीक बिबट्याने गाईचा फडशा पाडल्याची घटना आज (दि.२८) उघडकीस आली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबतची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गाईच्या मृत्यूचा पंचनामा केला आहे.

 

याबाबत वृत्त असे की, सत्तार गुलशन तडवी (रा.सहस्त्रलिंग) हा आपल्या गाईचा कळप घेऊन जंगलात चारण्यासाठी गेला होता, गाई चारुन परत घरी आला असता एक गाय कमी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या गायीच्या शोधासाठी तो पुन्हा जंगलात गेला असता, कंपार्टमेंट १८ मध्ये ही गाय मृत अवस्थेत पडलेली होती. याबाबतची माहिती वन विभागाला कळवताच वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय भदाने वनरक्षक राणी कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृत गायीच्या मानेवर व पाठीवर हल्ला झाल्याने हा हल्ला बिबटने केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रचंड गवत असल्याने बिबट्याचा माग मात्र काढता आलेला नाही.

Protected Content