कोल्हापूर (वृत्तसंस्था) आपल्याच एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून इतर तीन विदयार्थिनींवर लैगिक अत्याचार करणाऱ्या कोल्हापुरातल्या एका नराधम हॉकी प्रशिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विजय मनुगडे असे आरोपीचे नाव आहे.
मे २०१७ मध्ये कोल्हापूर येथील राजेंद्रनगर परिसरात बलात्काराची घटना घडली होती. आरोपी मनुगडेने शाळेतील सातवी आणि आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. यात मनुगडेने एका मुलीवर अत्याचारही केले होते. या घटनेप्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी क्रीडा प्रशिक्षक मनुगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या चारही खटल्यांचा आज एकत्रितपणे निकाल देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.आर.पाटील यांनी आज ही शिक्षा सुनावली.