खुशखबर : रशियात सर्वसामान्यांसाठी कोरोनाची लस उपलब्ध !

मॉस्को । रशियात आजपासून सर्वसामान्य रूग्णांसाठी कोरोनावर उपयुक्त ठरणारी स्फुटनिक व्ही ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. भारतासह अन्य राष्ट्रांमध्येही ही लस येत्या काही महिन्यांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता यातून बळावली आहे.

जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूची लस बनवण्यासाठी बर्याच देशांचे शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. दरम्यान, रशियामधून एक चांगली बातमी समोर येत आहे. रशियाची कोरोना विषाणूची लस स्पुतनिक व्ही ही सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रशियाने गेल्या महिन्यात ही लस मंजूर केली होती.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की लवकरच लसीची वितरण प्रादेशिक आधारावर सुरू केली जाईल. स्पुतनिक-व्ही ही लस नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी फॉर रशिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी विकसित केली आहे. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता सर्व नामरिकांसाठी तिला उपलब्ध करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ११ ऑगस्ट रोजी कोव्हीडवर लस तयार करत असल्याचे सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: याबाबतची घोषणा केली. यानंतर आता ही लस प्रत्यक्ष वापरात येणार आहे. रशियाची राजधानी असणार्‍या मॉस्कोतील नागरिकांना ही लस पहिल्यांदा देण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे लवकरच भारतासह अनेक देशांमध्ये रशियन लसीची क्लिनिकल चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स, भारत आणि ब्राझील येथे क्लिनिकल चाचण्या सुरू होतील असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content