शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना कक्ष होणार पुन्हा सुरू; अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सी- २ हा कक्ष सुरू करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिल्या आहेत. सोमवारी दि. १० जानेवारी रोजी त्यांनी कक्षाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

 

कोरोना महामारीची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सी-२ हा कक्ष पूर्वीसारखा सुरु करण्याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सोमवारी पाहणी करीत सूचना दिल्या. येथे पूर्णपणे साफसफाई करीत खाटांचे नूतनीकरण करण्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, गादी व चादरी स्वच्छ असाव्या. वेळोवेळी बदलल्या गेल्या पाहिजे, इतर अनावश्यक सामान हलवावे असेही त्यांनी सांगितले.

 

तसेच, डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांच्या ड्युट्या लावणे, त्यांची हालचाल नोंद ठेवणे, कोरोना महामारीबाबत आलेल्या माहितीनुसार तत्पर राहण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. यावेळीही वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!