‘पॉझिटीव्ह’ डॉक्टरने तपासणी केल्याने नऊ जणांना कोरोनाची बाधा !

बोदवड प्रतिनिधी । येथील एका डॉक्टरने स्वत: कोरोना बाधीत असतांनाही नियमांचे उल्लंघन करून रूग्णांची तपासणी केल्याने नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यांच्या विरूध्द तहसीलदारांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

आज बोदवड तालुक्यात तब्बल १९ रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, यातील एक धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी तहसीलदारांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार येथील एका डॉक्टरने (वय ४१, रा. शालीमार टॉकीज मागे, नाडगाव रोड, भडगाव) यांनी दिनांक २५ जून रोजी बोदवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी स्वॅब दिला होता. दरम्यान, स्वॅब दिल्यानंतर नियमानुसार त्यांना रिपोर्ट येईपर्यंत क्वॉरंटाईन होणे गरजेचे होते. तथापि, त्यांनी दिनांक २७ जून रोजी नाडगाव तर २८ रोजी शेलवड येथे रूग्णांची तपासणी केली. दरम्यान, २८ जून रोजीच यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. यानंतर त्यांनी तपासणी केलेल्या रूग्णांनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करण्यात आली. यात नाडगाव आणि शेलवड या दोन्ही गावांमधील एकूण नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

डॉक्टरने स्वॅब दिल्यानंतर होम क्वॉरंटाईन होण्याच्या नियमाचे उल्लंघन करून रूग्णांची तपासणी केली. व यामुळे त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले. यामुळे बोदवड येथील तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार, भादंवि, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ आणि महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यानुसार शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content