नवी दिल्ली वृत्तसंस्था | एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून यात ओमायक्रॉन या आवृत्तीच्या संसर्गाचा समावेश असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या असतांनाच आता डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या मिलाफातून कोरोनाची नवीन आवृत्ती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाची ओमायक्रॉन ही आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत आढळून आली असून यामुळे जगातील अनेक देशांमध्ये लक्षावधी लोक संक्रमीत झाले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी घातक असला तरी तो ज्या वेगाने लोकांना संक्रमित करत आहे ते चिंताजनक आहे. यातच आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचं एकत्रित असलेल्या डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचा शोध लागला आहे. सायप्रस विद्यापीठातील जैववैज्ञानिक प्राध्यापिका लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी डेल्टाच्या जीनोममध्ये ओमायक्रॉनचे अंश सापडल्याने त्याला डेल्टाक्रॉन असं म्हटलं आहे. त्यांच्या चमूला या नवीन व्हेरिएंटचे २५ रुग्ण आढळले आहेत.
डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या एकत्रितपणामुळे भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू शकतो. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टाक्रॉनवर भारी पडू शकतो. तर आजच हा व्हेरियंट किती घातक आहे हे सांगता येणार नसले तरी यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शास्त्रज्ञांनी केले आहे. अलीकडच्या काळात वाढीव संख्येने कोविड रुग्ण आढळत आहेत. बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी टेस्टींग किटचा तुटवडा निर्माण झाला आहे.