नाशिकहून ८४५ मजूरांना घेवून लखनौ रेल्वे रवाना

नाशिक वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशच्या ८४५ नागरिकांना विशेष रेल्वेने आज नाशिक येथून लखनौ येथे पाठविण्यात आले आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विशेष १६ डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले. यावेळी नाशिककरांच्यावतीने परराज्यातल्या या नागरिकांना टाळ्या वाजवून आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करत निरोप देण्यात आला.

कोरोनाच्या संकटात नाशिकमध्ये एक दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. अनेक मजूर आपल्या मुलाबाळांसह सर्व संसार पाठीवर घेऊन पायीच मुंबईहून नाशिकमार्गे आपआपल्या राज्यात निघाले होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून शेल्टर कॅम्पमध्ये ठेवलं होतं. या शेल्टर कॅम्पमध्ये या मजुरांची रितसर आरोग्य तपासणी, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था हे सगळं करण्यात आलं होतं. अखेर जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली.

शुक्रवारी १ मे रोजी रात्री शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या तब्बल ३४५ लोकांना ६ डब्ब्यांच्या विशेष ट्रेनने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आले. आज (२ मे) सकाळच्या सुमारास ८४५ उत्तर प्रदेशच्या रहिवाशांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. १६ डब्ब्यांच्या या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्ब्यात ५४ लोकं अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला रवाना केले.

Protected Content