बाहेती महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात संपन्न

जळगाव प्रतिनिधी | भारतीय संविधानाप्रती तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बाहेती महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात सुरुवातीला घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राज्यघटनेच्या उद्देशीकेचं सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांच्या सविधान जागृतीच्या संकल्पनेतून ‘भारतीय संविधान’ या संक्षिप्त स्वरुपातील पुस्तिकेचे विमोचन करण्यात आलं. प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत भारतीय राज्यघटनेविषयी माहिती, सरनामा, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे या संदर्भात संक्षिप्त स्वरुपातील माहिती समाविष्ट आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती संविधान दिनाच्या अनुषंगाने दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. पुस्तिकेच्या माहितीचे संकलन प्रा.गौतम भालेराव यांनी केले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या या कार्यक्रमात दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, महाराष्ट्र जनक्रांतीचे मुकुंद सपकाळे, साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल, प्रा.डॉ.सचिन पाटील, प्रा.डॉ. प्रदीप सुवाडकर, मुकुंदराव सपकाळे, कथाकार राहुल निकम, शिवराम शिरसाठ, कवी विजय लुल्हे, सुनील दाभाडे यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार प्राप्त केले व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे म्हणाले की, “सविधान संसदेत पारित झालं तो दिवस खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. सर्वांना समान संधी, समान अधिकार देणारा संविधान हा धर्मग्रंथ नाही तर जीवन ग्रंथच आहे. प्रतिज्ञेतील ‘भारत माझा देश आहे…’ ही भावना सविधानातून आलेली असून संविधानाचं रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे म्हणत तिचं पालन करण्याचा संकल्प या निमित्ताने सर्वांनी करावा” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात बोलतांना डॉ.मिलिंद बागूल यांनी, “या कठीण काळात संविधान हा जगण्याचा श्वास आहे म्हणत त्याचं रक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संविधानाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवत सर्वांच्या हक्क आणि अधिकारासाठी त्याची जागृती हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रा.डॉ.सचिन पाटील यांनी, “संविधानात मिळालेला न्याय, अधिकार जोपासायला पाहिजे. त्याची प्रत्येकाला जाणीव असावी. संविधानाचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण समजून घेतला पाहिजे” अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली. राचार्य डॉ.अनिल लोहार समारोप करताना आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “संविधान हा खऱ्या अर्थाने आपल्या जगण्याचा श्वास आहे. आपण सर्वजण घटनेच्या समृद्ध चौकटीत बांधले गेलेले आहोत त्यामुळे सर्वांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाने जात, धर्म, लिंग विषमता दूर सारत आपण भारतीय नागरिक आहोत ही भूमिका अंगीकारण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. संविधानाचे पावित्र्य राखत आपल्या हक्कांबाबत जागरूक रहावे” असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राहुल बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.मोरेश्वर सोनार यांनी केलं.

Protected Content