कर्नाटकात सत्तासंघर्ष भडकला : दावे-प्रतिदावे

BJP 7478

बेंगळुरू, वृत्तसंस्था | कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारमधील ११ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी संकटात सापडले असले तरी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र कर्नाटकात सर्व काही अलबेल असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. तसेच हे भाजपचे ‘ऑपरेशन लोट्स’ असून आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर सिद्धरामय्यांनाच कुमारस्वामी यांचे सरकार पाडायचा असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

कर्नाटकात राजकीय संकट निर्माण झाल्याने कुमारस्वामी हे अमेरिकेहून भारतात परतण्यासाठी निघाले आहेत. दुसरीकडे मुंबईत आलेल्या अकराही बंडखोर आमदारांच्या भाजप नेत्यांनी गाठीभेटी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राजीनामा दिलेल्या ११ पैकी ५-६ आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू असून त्यातून मार्ग निघेल, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. तसेच आमदारांच्या राजीनामा नाट्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मी स्वत: आमदारांच्या संपर्कात असून सर्व काही अलबेल असल्याचेही ते म्हणाले.

भाजपा आमदाराने घेतली भेट – काँग्रेस-जेडीएसच्या ११ बंडखोर आमदारांना मुंबईतल्या सोफिटेल हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी या आमदारांची भेट घेतली. तर काँग्रेस नेत्यांनीही या आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

तोपर्यंत आमदार मुंबईतच – दरम्यान, आम्ही अकराही जणांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. त्यानंतर आम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून निवडून येऊ, असं काँग्रेसचे बंडखोर आमदार प्रताप गौडा पाटील यांनी सांगितलं. जोपर्यंत आमचा राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू, असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

मी मुख्यमंत्री होणार नाही : खरगे – दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार अफवा होत्या. खरगे यांनी या अफवा फेटाळून लावल्या असून मी मुख्यमंत्री होणार नाही, असे मीडियासमोर स्पष्ट केले आहे. आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठीच या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राजीनामा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी नाराज आमदारांना केले आहे. दरम्यान, एच.डी. कुमारस्वामी यांचे सचिव एन.एच. कोनाराड्डी यांनी माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते एच.डी. देवेगौडा यांची भेट घेऊन कर्नाटकातील राजकीय संकटावर चर्चा केली.

येडियुरप्पा म्हणाले वाट बघा – मी सध्या तुमकूरला चाललो आहे. संध्याकाळी ४.०० वाजता परत येईल. कर्नाटकात काय राजकारण सुरू आहे, हे तुम्ही सर्व जाणून आहात, थोडी वाट पहा. कुमारस्वामी काय म्हणाले, त्यावर मला बोलायचे नाही. थोडी वाट पाह्यला हरकत नाही, असे भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

Protected Content