जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्रातर्फे वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी ‘मासिक रज:स्त्रायकालीन स्वास्थ्यसंवर्धक योग थेरपि’ प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले असून शिबिराचा समारोप शुक्रवारी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या उपस्थितीत झाला.
कोविडच्या संक्रमणामुळे शारीरिक व मानसिक स्वाथ्य टिकविणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या प्रेरणेने दि.४ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिंनीसाठी हे योग शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या. शुक्रवारी शिबिराच्या समारोपासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते.
यावेळी शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख व रेक्टर प्रा.मनिषा इंदाणी, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, योगमार्गदर्शन केंद्र प्रमुख इंजि.राजेश पाटील, वैशाली शर्मा, योग शिक्षिका चित्रा महाजन उपस्थित होते. डॉ.लिना चौधरी यांनी तारूण्यावस्थेत मुलींना मासिक रज:स्त्राव विषयक होणाऱ्या व्याधींवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग थेरपि अंतर्गत योगासन व प्राणायामाच्या माध्यमातून प्रशिक्षण व सराव करवून घेतला.
यावेळी मयुरी तांबट, प्रणाली वाणी या विद्यार्थिंनीनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लिना चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. मयुरी पाटील यांनी आभार मानले. सुनील चव्हाण, यशवंत गरूड, हिमंत जाधव, हिमंत पाटील, भगवान साळुंखे, रत्नाकर सोनार यांनी परिश्रम घेतले.