जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दर्जेदार रस्ते हे कोणत्याही शहराचे भूषण असतात. रस्ते हे विकासाचे प्राण आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बजावले. अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, नगरपरिषदा व नगर पंचायतींना देण्यात येणारा निधी आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील १८ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकार्यांच्या आढावा बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीसह विविध माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना भरीव निधी प्रदान करण्यात आला असून याच्या माध्यमातून अचूक नियोजनाने शहरांचा विकास साधण्याचे आवाहन केले. प्रशासक राजवटीत मुख्याधिकार्यांना आपली कार्यकुशलता दाखविण्याची संधी असून त्यांनी याचे सोने करावे असे आवाहन केले. तर, निधीच्या विनीयोगासह कामांच्या कार्यान्वयनाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देखील दिलेत.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना प्रदान करण्यात आलेला निधी आणि यातून झालेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, न.पा. शाखा आयुक्त जनार्दन पवार यांच्यासह जिल्ह्यातील १८ नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जनार्दन पवार यांनी ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकार्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नगरपालिकांना सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठी प्रदान करण्यात आलेला निधी आणि यातून झालेल्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. यात या दोन्ही वर्षांमध्ये नागरी दलीतेत्तर योजनेच्या माध्यमातून सदर १८ नगरपालिकांना २५ कोटी ६९ लक्ष ४५ हजार रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. याचप्रमाणे नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत २२ कोटी २५ लक्ष ९७ हजार रूपया तर दलीत वस्ती सुधार योजनेतून ४१ कोटी ९५ लक्ष ९३ हजार रूपयांचा निधी प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून डी.पी.सी. मधून नगरपालिकांना एकत्रीतपणे ८९ कोटी ९१ लक्ष ३५ हजार रूपयांचा निधी मिळाला असून यातील ३६ कोटी ७९ लक्ष ३२ हजार रूपयांचा निधी वापरण्यात आलेला आहे.
राज्य स्तरावरून नगरविकास खात्याच्या स्वर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरपालिकांना आतापर्यंत तब्बल ४६९ कोटी ८३ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून यातील ३०१ कोटी १७ लक्ष रूपये प्राप्त झाले असून २८५ कोटी २२ लक्ष रूपयांच्या निधीचा विनीयोग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठी नगरविकास खात्याकडून ४२ कोटी ७३ लक्ष रूपयांचा एकत्रीत निधी मिळाला आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून चोपडा, पाचोरा या नगरपालिकांना अनुक्रमे २ आणि ५ कोटी रूपये मिळाले आहेत. विशेष रस्ता अनुदान योजनेत चोपड्याला ३ कोटी तर पाचोर्याला ४ कोटी ७७ लक्ष रूपये मिळाले आहेत. नवीन नगरपंचायत सहाय्यता योजनेतून भडगावला १ कोटी ३३ लक्ष तर मुक्ताईनगरला १ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच विशेष वैशिष्टयपूर्ण योजनेत चोपडा- ४ कोटी ९९ लक्ष रूपये; मुक्ताईनगर- ४ कोटी ४८ लक्ष रूपये; धरणगाव-१३ कोटी रूपये; पारोळा- ३ कोटी १६ लक्ष रूपये; बोदवड १ कोटी ४९ लक्ष रूपये, बोदवड- १ कोटी रूपये तर एरंडोल नगरपालिकेस ४ कोटी रूपये प्रदान करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १८ नगरपालिकांचे स्वउत्पन्न ५१ कोटी ५७ लक्ष रूपये असून यातील तरतुदींच्या ५ टक्के म्हणजेच १ कोटी ७० लक्ष रूपयांचा निधी हा दिव्यांगांसाठी राखीव असून यातून १ कोटी ७० लाख रूपयांचा वापर करण्यात आलेला आहे.
चौदाव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील १८ नगरपालिकांना एकूण ४०३ कोटी २५ लक्ष रूपये प्राप्त झाले असून यातून ३८२ कोटी २३ लक्ष रूपयांचा खर्च झालेला आहे. यातून २१ कोटी रूपये शिल्लक असून या निधीचे तातडीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून नगरपालिकांना ७१ कोटी ५७ लक्ष ३० हजार रूपयांचा पहिला टप्पा मिळाला असून यातून ४१ कोटी ६८ लक्ष ७ हजार रूपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावर पंधराव्या वित्त आयोगाद्वारे टप्प्याटप्प्याने निधी येणार असल्याने यातून कामांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत घनकचरा प्रकल्पांसाठी नगरपालिकांना ६२ कोटी ९९ लाख २१ हजार रूपयांचा निधी मिळाला असून यातून ४८ कोटी ९१ लाख रूपयांचा वापर करण्यात आलेला असल्याची माहिती देण्यात आली. तसेच याप्रसंगी माझी वसुंधरा २.० अभियानाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तर, नगरपालिकेच्या मालकीच्या प्राथमिक आणि माध्यमीक शाळांच्या बळकटीकरणाबाबत निर्देश देखील देण्यात आलेत.
याप्रसंगी चोपडा शहरातील हद्दवाढ झालेल्या परिसरातील नागरी सुविधांसाठी ३८ कोटींचा पाठविलेला प्रस्ताव प्रलंबीत असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. याच प्रमाणे वरणगाव येथील विकास आराखडा हा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती दिली. तर कोविडच्या काळात कर्तव्य बजावतांना मृत झालेल्या २० कर्मचार्यांच्या वारसांना शासकीय निर्णयानुसार प्रत्येकी ५० लक्ष रूपयांच्या मदतीचे प्रस्ताव देखील शासनाकडे प्रलंबीत असून त्यासाठी पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून घेणार असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, पारोळा, पाचोरा, धरणगाव, भडगाव, जामनेर आणि शेंदुर्णी या आठ नगरपालिकांना अग्नीशमन सेवांच्या बळकटीकरणासाठी २ कोटी २९ लक्ष ५० हजार रूपयांचा निधी प्रदान करण्यात आलेला आहे. या सर्व शहरांमधील अग्नीशामन प्रणालीचे तातडीने लोकार्पण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात।तसेच वरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिलेत.