महामार्गावरील काम पूर्ण करा; पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग पहूर गावाजवळ वाघुर नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे पडले असून गावकऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच ३ निरपराध जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा , या मागणीचे निवेदन शहर पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, उपाध्यक्ष शरद बेलपत्रे, सदस्य सादिक शेख, डॉ. संभाजी क्षीरसागर, माजी अध्यक्ष शंकर भामेरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले.

जळगाव छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यावर महामार्गावरील वाहतूक आणि सुविधा वाढतील अशी अपेक्षा होती. वाहतूक वाढली मात्र सुविधा नसल्यात जमा आहेत.

पहुर हे चौफुलीवरील गाव असून वाघुर नदीच्या पुलाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही काम अपूर्णावस्थेतच असून याच पूल परिसरात प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी विद्यार्थीनी सह ३ जणांचा मृत्यू झालेला आहे . हा परिसर अजून किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल वाहन चालक करीत आहेत .

ठेकेदाराला कोणाचा राजाश्रय ?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना अंतर्गत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे . ठेकेदाराला वेळोवेळी काम पूर्ण करण्याविषयी मागणी करण्यात आली आहे . परंतु संबंधित ठेकेदार या मागणीकडे गांभीर्याने घेत नसल्याने काम अद्यापही अपूर्णच आहे . कोणाचा राजाश्रय तर या ठेकेदाराला नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

राष्ट्रीय महामार्ग की गाडरस्ता ?
७५३ एफ हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर या दोन जिल्ह्यांना जोडतो . आंतरराष्ट्रीय ख्यातीची अजिंठा लेणी याच राष्ट्रीय महामार्गावरच आहे . पहूर येथे मात्र या महामार्गावर अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा राष्ट्रीय महामार्ग आहे की एखाद्या शेताकडे जाणारा ‘गाड रस्ता ‘असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर रस्त्याचे काम पूर्ण करून नवीन पुल वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करावा , अशी मागणी होत आहे .

दरम्यान , आज बुधवारी ( ता . १२ ) पहूर शहर पत्रकार संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेटी घेऊन या संवेदनशील समस्येबाबत चर्चा केली . यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की ,जळगाव -छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारास याविषयी तात्काळ सूचना देऊन काम पूर्ण करण्यात येईल . तथापी काम त्वरित पूर्ण न झाल्यास याच अर्धवट काम झालेल्या पुलाजवळ लोकशाही मार्गाने रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघटनेने दिला आहे .या निवेदनावर शहर पत्रकार संघटनेचे सचिव गणेश पांढरे , तज्ज्ञ सल्लागार शांताराम लाठे , मनोज जोशी , रवींद्र घोलप , रवींद्र लाठे , जयंत जोशी , हरिभाऊ राऊत , किरण जाधव यांच्यासह सर्व पत्रकार संघटना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक , तहसीलदार जामनेर , कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना , पोलीस निरीक्षक पहूर आदिंना देण्यात आल्या आहेत .

Protected Content