‘मिशन विधानपरिषद’ साठी आ. गिरीश महाजनांकडे जबाबदारी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला दणका दिल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीतही चमत्कार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या तीन मोठ्या नेत्यांना या ‘स्पेशल मिशन’ची जबाबदारी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांचा समावेश आहे.

भाजपाने विधान परिषदेत पाच उमेदवारांना संधी दिली असून त्यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा समावेश  आहे. भाजपाने अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनाही संधी दिली होती. मात्र त्यांनी माघारीपुर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  त्यामुळे अर्थात, विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात असून यासाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे.

आतापर्यंत राज्यसभे प्रमाणेच विधानपरिषद सदस्यांची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीने बिनविरोध होत होती. परंतु यावेळी महाविकास आघाडीने राज्यसभे साठी आव्हान देत शिवसेनेने दोन उमेदवार दिले तर भाजपाने देखील तीन उमेदवार दिले. यात तडजोड न झाल्याने राज्यसभेची निवडणूक चुरशीची ठरली. त्याप्रमाणेच विधानपरिषदेत देखील महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन तर भाजपाचे  ५ असे ११ उमेदवार असल्याने निवडणूक अटळ असून चुरशीची आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने स्पेशल मिशन आखले असून याची जबाबदारी आ. गिरीश महाजन, प्रणीव दरेकर आणि आशीष शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. हे तिन्ही नेते आता भाजपला विजय मिळवून देण्यासाठी रणनिती आखत असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी राज्यसभा निवडणुकीतही महत्वाची भूमिका पार पाडली होती. या पाठोपाठ त्यांच्याकडे आता विधानपरिषदेचीही जबाबदारी आली आहे.

 

Protected Content