ठाकरे सरकारने चालविला वसुलीचा धंदा : सोमय्या

मुंबई: राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पोलीस बदल्यांमध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्तक्षेपाची कबुली दिल्याची माहिती समोर येताच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

 

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारने पोलीस बदल्यांच्या माध्यमातून वसुलीचा धंदा चालवल्याची टीका केली. ते आज ट्विट करुन म्हटले की, अनिल देशमुख आणि शिवसेनेचे अनिल परब हे दोघे पोलीस बदल्यांच्या रॅकेटचे सूत्रधार होते. देशमुख आणि परब कोट्यवधी रुपये घेऊन पोलीस बदल्यांची अंतिम यादी तयार करायचे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

७ डिसेंबर २०२१ रोजी ’ईडी’कडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ’ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकार्‍याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ’ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचवरून सोमय्या यांनी सरकारवर प्रहार केले आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ’ईडी’च्या चौकशीत अंतर्गत काय खुलासे झाले, हे आपल्याला माहिती नाही. पण सीताराम कुंटे यांच्या कबुलीमुळे पोलीस बदल्यांचा बाजार सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

Protected Content