सुरक्षेची त्रिसुत्री पाळा अन्यथा कोरोनाची त्सुमानी येणार- मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाची स्थिती आता धोक्याच्या वळणावर आहे. मास्क घाला, दोन हात अंतर ठेवा आणि हात धुवा या त्रिसुत्रीचे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामी येणार असल्याचा इशारा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना दिला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, आजवर अनेकदा संवाद साधला असून मी सांगितलेल्या सूचनांचे पालन केले, याबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले. प्रत्येक लढ्यात आपण यश मिळवले आहे. महाराष्ट्राने जे करायचे ठरविले ते करून दाखविले आहे. कोरोना सोबतच्या लढाईतचही आपण यश मिळवणार आहोत. यंदाचे उत्सव हे साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर दसरा, नवरात्री व दीपावली झाली. शिवसेनेचा दसरा मेळावा देखील साधेपणाने साजरा करण्यात आला. दिवाळीत फटाके न फोडण्याचे केलेले आवाहन देखील पाळण्यात आल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यात आले असले तरी कार्तीकी एकादशीच्या दिवशी सुध्दा गर्दी न करता वारी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सर्व घटकांच्या मदतीने यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. यातून महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा समोर आला आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्यांना त्यांनी धन्यवाद दिले. या मोहिमेने रूग्ण संख्या कमी झाली आहे. तथापि, दिवाळी नंतर गर्दी वाढली आहे. अर्थात, आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यातून लाट नव्हे तर सुनामी येण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्याकडे आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी त्यांच्यावर किती तणाव द्यायचा याचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या नव्या लाटेत तरूणांनाही संक्रमीत होत असल्याचे दिसून येत आहे. लस येणार असली तरी नेमकी केव्हा येणार याची खात्री नाही. लस आली तरी सर्व जनतेला लस द्यायची खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. मास्क घाला, दोन हात अंतर ठेवा आणि हात धुवा हीच त्रिसुत्री यातून आपल्याला वाचवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आता कोरोनातून बर्‍या झालेल्या रूग्णांना आता पोस्ट-कोविड दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचे आता दिसून येत आहे. यामुळे काही कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा रात्रीचा कर्फ्यू लावण्याची सूचना समोर आली आहे. मात्र लोकांनी स्वत:हून बंधने घालण्याची गरज आहे. लक्षणे असतील तर पुन्हा चाचणी करून घेण्याची गरज आहे. आपण वळणावर असतांना काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दी टाळा, अनावश्यक बाहेर पडू नका, पडलेच तर मास्क लावा, हात धुवा असे आवाहन त्यांनी केले.

Protected Content