जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची ऑफलाईन बैठक रविवारी सायंकाळी जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा महाजन यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या “जागतिक योगदिवसा”च्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विविध उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुनील गुरव तसेच जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. कृणाल महाजन यांनी यंदा केवळ एक दिवस योगदिन साजरा न करता “योगसप्ताह” साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. त्यांच्या या प्रस्तावाला सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

योगसप्ताहात चित्रकला, योगासन, योगनृत्य, योगगीत, सूत्रपठण आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जागतिक योगदिवशी रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार असून सुमारे ४० हजार रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.
या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला अनुपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आगामी कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. योगसप्ताहाचे वेळापत्रक व स्थळाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीचा समारोप सर्वांनी एकत्रितपणे योगप्रसारासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत करण्यात आला.



