Home पर्यावरण भडगावात इंधन बचतीसाठी सायकल रॅली

भडगावात इंधन बचतीसाठी सायकल रॅली


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी भडगावात जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मान्यवरांसह युवक आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवींद्र वाडेकर आणि परीक्षित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. वाढत्या इंधन दरांमुळे पर्यायी वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. आयोजकांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात शक्य तितका सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले.

रविवारी सकाळी आझाद चौक येथून रॅलीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर नगर पालिका, मेन रोड, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गावर सहभागी युवकांनी इंधन बचतीचे आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देत जनजागृती केली.

या रॅलीत भडगाव क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. डॉ.निलेश पाटील, विजय देशपांडे, जाकीर कुरेशी, प्रा. दीपक मराठे, रावसाहेब पाटील, डॉ. हेमंत पाटील, सुरेश भंडारी, चेतन पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. सहभागी नागरिकांनी सायकल चालवून निरोगी आरोग्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडगाव क्रिकेट अकॅडमीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शहरात अशा प्रकारच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सायकल रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


Protected Content

Play sound