मुख्यमंत्री अडीच महिन्यानंतर सार्वजनीक कार्यक्रमात सहभागी होणार !

मुंबई प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सर्जरीनंतर तब्बल अडीच महिन्यांच्या नंतर उद्या सार्वजनीक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना २ डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय बैठकांना प्रत्यक्षपणे अनुपस्थित राहत असल्याने भाजपने टीकाही केली होती. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते.

उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

Protected Content