खडसेंनी स्वत:हूनच दिला राजीनामा : मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर राजीनाम्यासाठी कोणताही दबाव नव्हता, तर त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

गत विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असे मानले जात होते. तथापि, देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने संधी दिल्याने खडसे नाराज झाले. मात्र त्यांच्याकडे महसूलसह अनेक महत्वाची खाती देण्यात आली. तथापि, भोसरी औद्योगिक वसाहतीमधील वादग्रस्त भूखंडाच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर विविध आरोपांची सरबत्ती करण्यात आली होती. यामुळे त्यांनी जून २०१६ मध्ये राजीनामा दिला होता. यानंतर अनेकदा एकनाथराव खडसे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली होती. त्यांच्या बोलण्यातून पक्षातील अंतर्गत कलह आणि दबावाने खडसे यांनी राजीनामा द्यावा लागला असल्याचे अधोरेखीत झाले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी खडसे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, भुखंड प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाथाभाऊ माझ्याकडे आले आणि त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली. यानुसार त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Add Comment

Protected Content