नाथाभाऊंसाठी खुशखबर ; राज्यसभेसाठी भाजपाची उमेदवारी निश्चित?

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनंतर भाजपानेही आपल्या उमेदवाऱ्यांचे नाव निश्चित केल्याचे वृत्त आहे. भाजपाकडून पक्षावर नाराज असलेले एकनाथराव खडसे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या ७ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जागांसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. त्यामुळे, मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी मिळणार असल्याचे कळते. तर, भाजप नेतृत्वाने उदयनराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंना राज्यसभेत पाठविण्याची तयारी सुरू केल्याचे समजतेय. यासोबतच, रामदास आठवलेंची खासदारकी कायम ठेवण्यात येत असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content