मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत येणार्या २५५ पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात असून यासाठीच्या ३१४ कोटी ६३ लक्ष निधीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या सर्व पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत विहीत दरडोई खर्चापेक्षा जास्त खर्च लागणार्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या उच्चाधिकारी समितीतर्फे मान्यता घ्यावी लागते. या अनुषंगाने आज खात्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत येणार्या २ तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या २५३ अशा एकूण २५५ पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली. यासाठी लागणाऱ्या ३१४ कोटी ६३ लक्ष च्या निधीस ही मान्यता देण्यात आली असल्यामुळे या सर्व पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जल जीवन मिशन हा राज्य व केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून त्यांतर्गत सन २०२४ पर्यंत राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापुर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या दि.२९.०६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले असून सदर निकषापेक्षा अधिकचा दरडोई खर्च असलेल्या योजनांकरीता पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता घेण्याची तरतूद आहे.