
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस उरले असताना बाजारपेठा विविध मिठाईंच्या दुकानांनी सजून गेल्या आहेत. गोड-धोडाचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी साजरी करताना आपण ज्या मिठाईवर प्रेमाने ताव मारतो, तीच मिठाई तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते, ही बाब नागरिकांसाठी गंभीर इशारा देणारी आहे. बाजारात बनावट आणि आरोग्यास घातक पदार्थांपासून बनवलेली मिठाईबाबत आरोग्य तज्ज्ञ आणि प्रशासन सतर्कतेचे आवाहन करत आहेत.
दिवाळी म्हटली की घरांची साफसफाई, सजावट, लक्ष्मीपूजन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोडधोडाचा सढळ वाटप! नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी यांना मिठाई वाटून शुभेच्छा देण्याची परंपरा आपण सर्वजण जपतो. हीच मिठाई आनंदाचे आणि आपुलकीचे प्रतीक ठरते.
बनावट खवा, बटाट्यापासून तयार केलेले दुधाचे विकल्प, आयोडीनयुक्त सिंथेटिक दूध, युरिया, डिटर्जंट आणि इतर रसायनांच्या मदतीने तयार केलेली मिठाई आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते. अशा मिठाईच्या सेवनाने अपचन, विषबाधा, यकृत विकार, त्वचाविकार आणि काही वेळेस थेट मृत्यूचाही धोका निर्माण होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दिवाळीच्या खरेदीत गडबड आणि गर्दीचा फायदा घेत हे बनावट पदार्थ विक्रेते ग्राहकांना फसवतात. आकर्षक पॅकिंग, चमकदार रंग आणि कमी किमतीच्या आमिषाने ग्राहकांना गाफील ठेवले जाते. विशेषत: रस्त्याच्या कडेला किंवा अनधिकृत ठिकाणी उघडण्यात आलेल्या मिठाईच्या दुकानांमध्ये अशी भेसळयुक्त मिठाई विकली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
नागरिकांनी मिठाई खरेदी करताना अधिकृत, परवाना असलेल्या दुकानांमधूनच खरेदी करावी, बिल घ्यावे आणि मिठाईचे स्वरूप व वास तपासून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः खवा, दूध, बर्फी आणि लाडू यांसारख्या पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागानेही अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी गोडीच्या आड जीव धोक्यात घालू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.



