जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवार, २३ जून रोजी यावल पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२४ तक्रारी प्राप्त, तातडीने निराकरण
या तक्रार निवारण दिनामध्ये नागरिकांकडून जिल्हा परिषद आणि तिच्या अधिनस्त विभागांशी संबंधित एकूण २४ तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे, यातील अनेक तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याची कार्यवाही कार्यक्रमस्थळीच करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून काही तक्रारी लगेचच सोडवल्या, तर उर्वरित तक्रारींच्या समाधानासाठी निश्चित कालबद्ध कार्ययोजना आखण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास आ.अमोल जावळे, आ.चंद्रकांत सोनवणे, जि.प. सीईओ मिनल करनवाल, अतिरिक्त सीईओ रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासन लोकाभिमुखतेचा प्रत्यय
तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, अडचणी आणि समस्या मोकळेपणाने मांडल्या. प्रशासनाने दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसले. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना मिळाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या लोकाभिमुखतेचा प्रत्यय नागरिकांना आला.