जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यात आज एम.आय.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या नवीन २०० बेड हॉस्पिटलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या महत्त्वाच्या सोहळ्यादरम्यान, जळगावच्या गोदावरी फाउंडेशनचे संचालक आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांचा एम.आय.टी.च्या संचालिका डॉ. सुचित्रा कराड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
शिक्षण आणि आरोग्यात सहकार्याचे नवे पर्व
यावेळी दोन्ही संस्थांनी भविष्यातील सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत एकत्रित प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रो. विश्वनाथ डी. कराड यांनी स्थापन केलेल्या एम.आय.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या या नवीन रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळतील अशी अपेक्षा आहे.
डॉ. सुचित्रा कराड यांनी डॉ. अनिकेत पाटील यांचे स्वागत करताना, एम.आय.टी. संस्थेची विस्तृत माहिती दिली. उद्घाटन समारंभानंतर, जळगाव आणि पुणे दरम्यान आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर सहकार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. हा उपक्रम शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील लोकांसाठी आरोग्य सुविधा अधिक सुलभ आणि समृद्ध करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.