नागरिकांनो, “फटाक्यांना नाही म्हणा”; सामाजिक संघटनांचे आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी | आनंदाचा आणि मांगल्याचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. मात्र या दिवाळीत हानिकारक ठरत असणारे फटाके न फोडता त्याऐवजी आनंद वाटावा आणि फटाकेमुक्त दीपावली साजरी करावी असे आवाहन नागरिकांना विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. तसेच फटाक्यांच्या ध्वनीमुळे ध्वनीप्रदूषण होते. फटाके बनविणाऱ्या कारखान्यात बहुतांश लहान मुले काम करतात. त्यामुळे बाल कामगार प्रथेला चालना मिळते. अनेक जीवघेणे अपघात होतात. अनेक जण जखमी होतात. पशु पक्षी देखील जखमी होवून त्यांना त्रास होतो. पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. अशा तोट्यांमुळे फटाके फोडून करोडो रुपयांचा धूर काढण्यापेक्षा त्याला विधायक पर्याय नागरिकांनी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फटाक्यांऐवजी किल्ले बांधणे, कुटुंबासह सहलीला जाणे, चांगली पुस्तके घेवून ती वाचणे, मैदानी विविध खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवणे, मुलांना बौद्धिक खेळणी घेऊन देणे, गरीब वस्त्यामध्ये तसेच गरजूंना मिठाई, कपडे, फराळ, पुस्तके वाटणे किवा घरी कोणी आजारी असेल तर त्यासाठी पैसे देणे असे उपक्रम नागरिकांनी राबवावे जेणेकरून सामाजिक बांधिलकी जोपासली जाणार आहे. फटाकेमुक्त दिवाळी अभियानात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युवाशक्ती फौंडेशन, श्री जैन युवा फौंडेशन, संस्कार परिवार, वर्धिष्णू बहुद्देशीय सामाजिक संस्था, माहेश्वरी गणगौर महिला मंडळ, जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळ, जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समिती, स्नेहल प्रतिष्ठान, मराठी विज्ञान परिषद, जिल्हा कोळी समाज माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुद्देशीय मंडळ, ओबस्टेट्रिक गायनॉकॉलॉजिकल सोसायटी, जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी या संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content