मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अपुऱ्या बसफेऱ्या आणि पुलाच्या प्रलंबित बांधकामामुळे बंद झालेल्या बसफेरी मुळे विद्यार्थ्यांना पायपीट करत किंवा मालवाहू वाहनाला लोंबकळत प्रवास करत विद्यालयात जाण्याची मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील विद्यार्थ्यांवर वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात असलेले धामणगाव तांडा, बोरखेडा हे गाव मुक्ताईनगर ते कुऱ्हा या मुख्य रस्त्यापासून आत मध्ये तीन किलोमीटरवर अंतरावर आहेत. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत गेल्या दीड वर्षा पासून पुलाचे काम सुरू आहे. परंतु हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या गावात येणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कुऱ्हा आणि मुक्ताईनगर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर पायपीट करत किंवा मिळेल त्या खाजगी प्रवाशी वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करत विद्यालयात जावे लागत आहे. नागरिकांना सुद्धा शेती साहित्य, शेतमाल व इतर साहित्य वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. मोटरसायल व इतर वाहने चिखलामुळे घसरून अपघात घडत आहेत तरी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करून पुलाचे काम संथगतीने करत आहेत.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज ६ ऑगस्ट रोजी या रस्त्याने धामणगाव येथे जात असताना त्यांना एका मालवाहू वाहनात शालेय विद्यार्थी दाटीवाटीने प्रवास करताना आढळून आले असतांना त्यांनी ते वाहन थांबवून त्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत फोन वरून पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्या विषयी चर्चा केली व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे विद्यार्थी पालक आणि नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या ‘मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात आधीच अपुऱ्या आणि अनियमित बसफेऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नागरिकांचे हाल होतात. आम्ही वेळोवेळी ग्रामिण भागातील बसफेऱ्या नियमित सुरू कराव्या आणि मुक्ताईनगर आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे नियमित पाठपुरावाकरत आहोत. धामणगाव येथिल या पुलाचे काम लवकर पुर्ण करण्या विषयी सा बां विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यापूर्वी सुद्धा चर्चा झाली. परंतु अद्यापही हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. या अपूर्ण बांधकामामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीचे झाले असुन बसफेऱ्या बंद केल्यामुळे नागरिकांची विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे. विद्यार्थ्यांना पायपीट करून किंवा खाजगी वाहनाने प्रवास करून विद्यालयात जावे लागते आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत आहे तसेच एखादेवेळी यातून अपघातासारखी अनुचित घटना घडू शकते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे अपूर्ण बांधकाम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे हे काम लवकर पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.